नागपूर (वृत्तसंस्था) सोन्या-चांदीचे दुकान बंद करून घराकडे परतताना डोळ्यांत मिरचीपूड टाकून सोनारास ८० लाख रुपयांनी लुटल्याची घटना २ डिसेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता एमआयडीसी बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकळघाट-खापरी मोरेश्वर मार्गावर घडली. दोन दिवस उलटूनही चोरटे पोलिसांना गवसले नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खापरी मोरेश्वर येथील रहिवासी सोनार अतुल रामकृष्ण शेरेकर (३७) यांचे टाकळघाट येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रासमोरील राम-शिव पॅलेसमध्ये ‘अतुल ज्वेलर्स’ नावाने दुकान आहे. शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र रेलचेल असते. नेहमीप्रमाणे ते रात्री नऊ वाजता ज्वेलर्सचे दुकान बंद करून आपल्या कारने खापरी मोरेश्वर येथे घरी जाण्यास निघाले. यादरम्यान खापरी मोरेश्वर मार्गावर कटरे कॉलनी पार केली असता पालीवाल यांच्या शेताजवळ दुचाकीने आलेल्या अज्ञात दोन आरोपींनी अतुल शेरेकर यांच्या चारचाकीसमोर दुचाकी आणून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. कट लागल्याने शेरेकर यांनी दुचाकीचालकाला ‘तुला लागले का?,’ असे विचारले असता त्याच्या साथीदाराने मिरचीपूड त्यांच्या डोळ्यावर फेकली आणि त्यांना खाली नाल्यात धक्का देऊन ढकलून दिले.
चारचाकीमध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख असलेली ८० लाखांची बॅग घेऊन पळ काढला. शेरेकर यांनी डोळे पुसून बॅग घेऊन पळणाऱ्या आरोपींचा पाठलाग केला. यादरम्या त्यांचे चारचाकीवरून नियंत्रण सुटल्याने का नाल्यात जाऊन उलटली. यामध्ये शेरेकर किरकोळ जखमी झाले. आरोपींनी दुचाकी नाल्यात फेकून पोबारा केला.