कुल्लू (वृत्तसंस्था) हिमाचलच्या कुल्लूमध्ये एका भीषण अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झालेत. औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीजवळ हा अपघात झाला.
रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास कुल्लूमधील बंजार व्हॅलीच्या घियागी भागात NH-305 वर टेम्पो ट्रॅव्हलर खड्ड्यात पडल्याने हा भीषण झाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक बचावासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र खराब हवामान आणि अंधारामुळे बचावकार्यात मोठी अडचण आली. या बचावकार्याला सुमारे दोन तास लागले. अपघातात जखमी झालेल्या 10 लोकांपैकी 5 जणांना कुल्लूच्या झोनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून 5 जणांवर बंजार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 11.35 वाजता मदत आणि बचाव कार्य संपले. मृतांमध्ये 5 तरुण आणि 2 मुलींचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये तीन आयआयटी वाराणसीचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.