जळगाव (प्रतिनिधी) मोबाईलमधील व्हाटस अॅपची सेटिंग अॅटो डाऊनलोडवर होती. त्यामुळे व्हाट्सअॅपवर आलेली एपीके फाईल डाऊनलोड झाली. यामुळे जळगावातील निलेश हेमराज सराफ (वय ४९, रा. अजय कॉलनी) या व्यावसायिकाच्या खात्यातून ४ लाख ६४ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर होवून फसवणूक झाला. हा प्रकार दि. ९ रोजी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अजय कॉलनीत निलेश हेमराज सराफ (वय ४९) हे वास्तव्यास असून त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्हाटस अॅपवर एका मोबाईल क्रमांकावरून कस्टमर्स सर्व्हस सपोर्ट ही एपीके फाईल आली. त्या वेळी त्यांच्या व्हाटस अॅपची सेटिंग ‘अॅटो डाऊनलोड’वर होती. त्यामुळे ही फाईल त्यांच्या मोबाईलमध्ये अॅटोमॅटीक डाऊनलोड झाली. त्यावेळी सराफ याच्या बँक खात्यातून ४ लाख ६४ हजार ४३९ रुपये डेबिट झाले.
अॅक्सेस मिळताच १५ मिनीटात रक्कम गायब
सराफ यांच्या मोबाईलमध्ये एपीके फाईल डाऊनलोड होताच समोरील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळविला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पाच ते सहा ट्रान्झेक्शन झाले व १० ते १५ मिनिटात ही रक्कम गायब झाली.
४० ते ५० ओटीपी आले मोबाईलवर
सराफ यांना त्यांचा मोबाईल गरम झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईल पाहिला. यावेळी त्यांना पैसे काढल्याचे मेसेज आलेले दिसले. तसेच ४० ते ५० ओटीपीदेखील आलेले होते.
वॉशिंग मशिन दुरुस्तीनंतर घडली घटना
सराफ यांची वाशिंग मशिन खराब झाल्याने त्यांनी कस्टमर केअरला कॉल केला होता. त्यानंतर कर्मचारी येऊन मशिनची दुरुस्ती करून गेले होते. त्यासाठी आलेल्यांनी ओटीपी संबंधितांना दिले. त्यानंतर ही दुरुस्तीची घटना घडल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार घडला. त्यामुळे कस्टमर केअरला केलेला कॉल नंतर झालेली फसवणूक याचा काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.
















