जालना (वृत्तसंस्था) सोलापूर-धुळे महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरमार्गे बीडकडे निघालेली भरधाव अल्टो कार अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकार साखर कारखान्याजवळ (समर्थ) उभा असलेल्या कंटेनरवर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
सदर कार कंटेनरखालीच दबली गेल्याने ग्रामस्थ व पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढून कारमधील तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये दोन तरुणांसह एका सात ते आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे. अमोल कैलास जाधव (२५, रा. लक्षाची वाडी ता. अंबड) ओमकार बळीराम गायकवाड ( २०, रा. पिंपरखेड ता. अंबड) आणि माऊली संभाजी गायकवाड (८) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आहे.
हा अपघात बुधवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंकुशनगर येथील साखर कारखान्याजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच गोंदीचे सपोनि. रविंद्र ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून अगोदर कारमधील तिघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तिघांना बाहेर काढून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, परंतू डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. इकडे अपघातग्रस्त वाहनांना जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती