जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दादावाडी येथे राहणारे दाम्पत्य रावेर येथे मुलाकडे गेलेले असतांना बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा एकुण ४७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील दादावाडी परिसरात निवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत माधवराव बडगुजर (वय ६७) हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहेत. १४ सप्टेंबर रोजी चंद्रकांत बडगुजर हे पत्नीसह रावेर येथे शिक्षक असलेले पंकज बडगुजर या मुलाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख सात हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत, १० हजार रुपये किमतीच्या गणपतीची चांदीच्या दोन मूर्ती, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, जोडवे असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या महिलेने गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता चंद्रकांत बडगुजर यांच्याशी संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर बडगुजर कुटुंबीय घरी आले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून ते जिन्याखाली पडलेले दिसले. तसेच घरामधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तर कपाटात ठेवलेली रोकड व सोने-चांदीचे दागिने दिसले नाही. याप्रकरणी गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील करीत आहेत.