जळगाव (प्रतिनिधी) पाचशे रुपयांच्या नकली नोटा चलनात आणणाऱ्या संशयीत चेतन शांताराम सावकारे (वय २७, रा. पुण्य नगर कॉलनी, यावल) या तरुणाचा कट जिल्हापेठ पोलिसांनी उधळून लावला. त्याच्याकडून ४८ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटांचे हे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे.
शहरातील रावसाहेब रुपचंद विद्यालयाच्य मागील बाजूस असलेल्या गल्लीमध्ये एक संशयीत नकली नोटा चलनात वापरण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, मिलींद सोनवणे, जयेश मोरे, विशाल साळुंखे, तुषार पाटील, अमितकुमार मराठे यांचे पथक रवाना झाले. या पथकाने रावसाहेब विद्यालयाच्या परिसरात सापळा रचला. दरम्यान, (एमएच, सीएल २२२१) क्रमांकाच्या बुलेटवरुन एक तरुण त्याठिकाणी आला. पथकाला त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांच्या तावडीतून तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र पोलिसांनी त्याला जागेवरच रोखून धरले.
बुलेटवरुन आलेल्या संशयीत चेतन सावकारे याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ५०० रुपये दराच्या ९७ नोटा मिळून आल्या. सुरुवातीला पोलिसांना देखील त्या नोटा खऱ्या असल्याचे समजले. मात्र त्याची बँकेतील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केल्यानंतर त्यांनी त्या नकली असल्याचा अहवाल दिला.
चौकशीत देत होता उडवाउडवीची उत्तरे !
नकली नोटा चलनात आणण्यापुर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी संशयीत तरुणाचा कट उधळून लावला. त्याने या नोटा कुठून आणल्या याबाबत त्याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र अटकेतील संशयीत चेतन सावकारे हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सण-उत्सवाच्या काळात नकली नोटांचे रॅकेट सक्रीय !
सद्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान, हीच संधी साधत संशयीताने नकली नोटा चलनात आणत होता. मात्र त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा आल्या कशा याची देखील चौकशी केली जात असून नकली नोटा तयार करण्यापासून ते चलनात आणणाऱ्यांचे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.