जळगाव (प्रतिनिधी) बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींग काम करीत असलेल्या मजुर दुसऱ्या मजल्यावर काम करीत होते. त्यांचा तोल जावून ते खाली कोसळून डोक्याला गंभीर दुखापत होवून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी परिसरात घडली. रहिम कासम पिंजारी (वय ५२, रा. मढी चौक पिंप्राळा) असे मयत मजूराचे नाव आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील मढी चौकात रहिम पिंजारी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. ठेकेदाराकडे सेंट्रीग काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. ठेकेदाराने गणेश कॉलनीत साईट सुरु असल्याने रहीम पिंजारी हे शुक्रवारी सकाळी कामावर गेले होते. बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर ते सेंट्रींग काम करीत असतांना दुपारच्या सुमारात त्यांचा दुसऱ्या मजल्यावरुन तोल जावून ते खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रहिम पिंजारी यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच रहिम पिंजारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयत दाखल केले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यांची तपासणी करीत रहिम पिंजारी यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.