पुणे (वृत्तसंस्था) उपाहारगृहातील जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला तिने मारहाण केल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. याप्रकरणी नूतन सुभाष सुर्वे (45, रा. केदारीनगर, वानवडी) हिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नूतन सुर्वे ही श्रीसागर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने मद्यपान केले होते. जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे संतापली. तिने हॉटेलमधील कामगार आणि व्यवस्थापकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी हॉटेलमध्ये जेवण करणार्या ग्राहकांच्या ताटात पाणी ओतले तसेच ग्राहकांना तिने शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच महिला पोलिस कर्मचारी पोलिस नाईक वनिता माने ह्या हॉटेलमध्ये पोहोचल्या.
त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील सुर्वेने गणवेशात असलेल्या माने यांच्या नावाची पट्टी खेचली. माने यांना धक्काबुक्की करून त्यांचा अंगठा पिरगळला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणणे तसेच उपाहारगृहात गोंधळ घातल्या प्रकरणी नूतन सुर्वे हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस नाईक वनिता माने यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या वाहनतळाजवळ श्रीसागर हॉटेलात ही घटना घडली.