जळगाव (प्रतिनिधी) बसमध्ये चढणाऱ्या सुनिता नारायण चौधरी (वय ४०, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या महिलेच्या गळ्यातून २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना नवीन बस स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सुनिता चौधरी या महिला वास्तव्यास आहे. दि. ४ रोजी त्या शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे जाण्यासाठी नवीन बस स्थानकावर आल्या होत्या. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव ते शिंदखेडा जाणारी (एमएच १४, बीटी १८५४) क्रमांकाची बस आली. यावेळी महिला बसमध्ये चढल्यानंतर त्यांना गळ्यातील पोतचा एक पदर हा लोंबकळत होता. त्यांनी पोतला हात लावून बघितला असता त्यांना गळ्यातील पोत तुटलेली दिसून आली आणि त्यातील दोन वाट्या आणि चार मणी दिसून आले नाही.
परिसरात मिळून न आल्याने दिली पोलिसात तक्रार
महिलेने घटनेची माहिती लागलीच पतीला दिली असता, ते मुलासह बस स्थानकावर आले. त्यांनी देखील तुटलेल्या पोतचा शोध घेतला. मात्र तरी देखील त्यांना मिळून आली नाही. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















