चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षांची मागणी लक्षात घेता शहराजवळच असणाऱ्या खडकी बु येथे लवकरच भव्य शाहू भवन भरण्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले आहे. ते मासिक शाहू मराठाच्या वतीने राज्यस्तरीय सस्नेह मराठा समाज मेळाव्यात बोलत होते.
मासिक शाहू मराठाच्या वतीने राज्यस्तरीय सस्नेह मराठा समाज मेळाव्याचे आयोजन आज चाळीसगाव येथे करण्यात आले होते. यानिमित्ताने दक्षिणी मराठा समाजातील उद्योजक, गुणवंत, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर यांचा सत्कार व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातील मान्यवर अतिथी उपस्थित होते. प्रशांत गायकवाड यांनी संपादित केलेल्या मासिक शाहू मराठाच्या स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यातील समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षांची मागणी लक्षात घेता शहराजवळच असणाऱ्या खडकी बु येथे वारकरी भवन लगतच भव्य शाहू भवन उभारण्यासाठी ८० लाख निधी उपलब्ध झाला आहे. येत्या वर्षभरात त्याचे काम पूर्ण करून त्याचे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण करण्याचे आश्वासन दिले.