वर्धा (वृत्तसंस्था) आष्टी तालुक्यातील मोई तांडा येथील पोलीस पाटील यांना चालत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार, २१ जुलै रोजी घडली. परसराम वामनसिंग चव्हाण (५२), असे मयताचे नाव आहे.
मोई तांडा येथील पोलीस पाटील परसराम चव्हाण हे सकाळी ११ वाजता आष्टी येथे जातो म्हणून दुचाकीने घरुन निघाले होते. किन्ही गाव ओलांडून जाम नदीचा घाट चढल्यावर चालत्या गाडीवरच त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि ते जमिनीवर पडले. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या एकाने त्यांना जमिनीवर लोटून प्राथमिक उपचार केलेत.
त्यानंतर चव्हाण यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांनी अमरावती येथे नेण्याचा सल्ला दिला. अमरावती येथे हलविले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषीत केले. या घटनेची वार्ता मोई तांडा गावात पोहोचताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. त्यांच्यामागे मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.