चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उंबरखेडे येथे अंत्यविधीसाठी आलेल्या नरडाणे येथील दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार दिलेल्या धडकेत दोन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. हा अपघात चाळीसगाव- धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याजवळ घडली.
उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथील गोरख दिनकर पाटील यांचे भाचजावई तुषार त्र्यंबक भामरे (रा. पिंप्राळा नरडाणे ता. शिंदखेडा) हे दुचाकीने पत्नी हेमांगी व दोन वर्षाची मुलगी गितांजली यांच्या समवेत उंबरखेड येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर दुचाकीने उंबरखेड येथून नरडाणाकडे जात होते. चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याच्या पुढे तुषार भामरे हे रस्त्याच्या कडेने हळूवार खड्डे चुकवत जात असतांना मागाहून येणाऱ्या मालवाहू टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तुषार भामरे हे पत्नी हेमांगी भामरे व त्यांच्या मांडीवर बसलेली मुलगी गितांजली (2 वर्षे) मोटारसायकलवरून खाली पडले. त्याचवेळी गितांजलीच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















