नांदेड (वृत्तसंस्था) वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकपुरा भागात एका हॉटेल मालकांचा राहत्या घरीच धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. १) सकाळी उघडकीस आली. शेख युनुस शेख पाशा (वय ४५ रा. खकडपुरा, नांदेड) असे खून झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. दरम्यान, वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसात दोन खूनाच्या घटना झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरातील वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकपुरा भागात महेबुबिया मस्जिदच्या पाठीमागे वाघी रस्त्यावर असलेल्या राहत्या घरी हॉटेल मदिना बिर्याणीचे मालक शेख युनुस शेख पाशा (वय ४५) यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. सदरची घटना रविवारी (दि. १) सकाळी उघडकीस आली. या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, शेख युनुसचा कोणत्या कारणासाठी आणि कशासाठी खून करण्यात आला आहे. याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, शनिवारी बंदाघाट परिसरात एका महिलेचा खून करून तरूणाने त्यांच्या गावी शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ही खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.