तमिळनाडू (वृत्तसंस्था) तामिळनाडूतील कालाकुरिची येथील शंकरपूरम परिसरात आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. शहरातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी झाले आहेत. फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीनंतर ज्वाळांचे प्रचंड लोट उठलेले पाहायला मिळाले.
आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, स्थानिक प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना तमिळनाडू सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही. दिवाळीमुळे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टॉक ठेवण्यात आला होता. मंगळावारी रात्रीच्या सुमारास गोडाऊनमधून धूर येत असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच संपूर्ण गोडाऊनला आग लागली. आग लागल्याने फटाक्यांचा आवाज, नागरिकांचा आक्रोश या सर्वांमुळे एकच गोंधळ उडाला होता.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर इतर ९ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी पीएन श्रीधर यांनी दुजोरा दिला आहे.