नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हुंड्या (Dowry) साठी होणार्या छळासंबंधी महिलांकडून किरकोळ आरोपांवरूनही गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबत चिंता व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या प्रकरणांत स्पष्ट आरोपांशिवाय पतीच्या नातेवाईकांवर खटला चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
अशा प्रकरणांत किरकोळ व बहुउद्देशीय आरोपांवरून पतीच्या नातेवाईकांवर खटला चालवता येणार नाही, असे बजावत न्यायालयाने महिलेच्या सासरच्यांविरुद्ध चालवला गेलेला हुंडय़ाचा खटला फेटाळून लावला. न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आजकाल हुंड्यासाठी होणाऱ्या छळासंबंधित 498(ए) हे भादंवि कलम पतीच्या नातेवाईकांना आपली धमक दाखवून देण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जात आहे. अशा फौजदारी खटल्यात निर्दोष सुटण्याची शक्यता असते. मात्र हुंडय़ासाठीच्या छळाचा गंभीर डाग पुसला जात नाही. त्यामुळे सर्वसाधारण आणि बहुउद्देशीय आरोप करण्याचे प्रकार थांबवावेत असे मत खंडपीठाने नोंदवले. बिहारमधील हुंडय़ाच्या प्रकरणात सासरच्यांवर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत पती व त्याच्या नातेवाईकांनी न्यायालयात दाद मागितली होती.