कोल्हापूर (वृत्तसंस्था) पन्हाळा पायथ्याशी बापूर येथील शिवारात पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसून नंदा गुंगा मगदूम (४९) व अजय मगदूम (३०) या माय-लेकरांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, अजिंक्य हा सकाळी ७ वाजेच्या सुमारास नेबापूर शिवारातील जमदाडकी नावाच्या शेतात भाताच्या तरूंची उगवण पाहण्यासाठी व खुरपणी करण्यासाठी तसेच खत टाकण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी अजिंक्य शेतातून परत आला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी नंदा गेल्या होत्या. त्यावेळी हातात विद्युत तार पकडलेल्या अवस्थेत मुलगा अजिंक्य निपचित पडलेला दिसला. घाबरून आईने धावत जाऊन सोडवण्यासाठी मुलाला स्पर्श करताच तिला सुद्धा विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिचाही जागेवरच मृत्यू झाला.
पतीच्या निधनानंतर नंदाताईने मोलमजुरी आणि शेती व्यवसाय करून मुलांचे पालनपोषण केले. अजय विवाहित असून, त्याला दोन अपत्ये आहेत. तो गवंडी काम करत होता. घटनेनंतर पन्हाळा विद्युत मंडळाने घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा बंद केल्याने दुपारपर्यंत या भागातील विद्युतपुरवठा बंद होता. पन्हाळा पोलिसांनी पंचनामा करून पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर माय- लेकरांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. तर महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांसह नागरिकांनी रोष व्यक्त केला.
















