धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठेलगत जैन गल्लीतील एक बंद घर फोडल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. चोरी माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील मुख्य बाजारपेठेत राजकमल ज्वेलर्सचे मालक श्री. विभांडिक बंधू यांचे घर आहे. श्री. विभांडिक हे बाहेरगावी येथे कामानिमित्त गेले होते. अज्ञात चोरट्यांनी हीच संधी साधत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साधारण सोने, चांदी आणि २० हजाराची रोकड चोरून नेली आहे. चोर स्थानिक जाणकार असल्याची शक्यता असून तसेच चोरी करत असतांना आवाज झाल्यामुळे घाबरून चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचाही अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, घरातील मोठी रोकड आणि इतर दागिने सुरक्षित असून मोजका ऐवज चोरून नेल्यामुळे पोलीसांनी या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पंचनामा करत होते.
















