अहमदनगर (वृत्तसंस्था) ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन…जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन !, असं म्हणतात की, प्रेमाला जात, धर्म, भाषा, पंथ याचे बंधन नसते. परंतू आता प्रेमाला देशाचे बंधन नसते हे समोर आले आहे. आता चीनची मुलगी संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावची सून झाली असून या अनोख्या विवाह सोहळ्याची मोठी चर्चा समाजमाध्यमांवर होत आहे.
चीनची तरुणी आणि संगमनेरचा तरूण यांची मने जुळली. आधी चीनमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केले व नंतर पारंपारिक पद्धतीने विवाह केला. योगा क्लासच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या जोडप्याचा लग्न सोहळा संगमनेरच्या ग्रामीण भागात झाला. संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावचा तरूण राहुल हांडे चीनमध्ये जाऊन तेथील नागरिकांना योगाचे शिक्षण देत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हांडे चीनमध्ये योगाचे क्लासेस चालवतो. यादरम्यान शिक्षक म्हणून काम करत असताना चीनची नागरीक असलेल्या शान छांग या मुलीशी त्याची मैत्री झाली. या मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले आणि काही काळ सोबत घालवल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
राहुल आणि शान छांग यांनी चीनमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केले. लग्न झाल्यानंतर राहुल आपल्या बायकोला घेऊन भारतात आपल्या गावी आला. येथे आल्यावर पुन्हा पारंपारिक हिंदू पद्धतीने सर्व नातलगांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न करण्याचा निर्णय राहुल यांच्या नातेवाईकांनी घेतला. सोमवारी (दि. ३ जुलै) घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात हे लग्न पार पडले. हे लग्न करताना एकही विधी करायचा त्यांनी सोडला नाही. अगदी हळदीपासून ते सात फेऱ्यांपर्यंत अशा लग्नाच्या सर्व विधींचा यात समावेश करण्यात आला. ही सगळी पद्धती आणि सर्व विधी मुलगी शान छांग हिच्यासाठी नवीन होत्या. या सगळ्या प्रथांचा तिने अगदी मनमुराद आनंद घेतला. इथले वातावरण, इथल्या लोकांचे प्रेम बघून नवरी मुलगी हरखून गेली होती.
चीनमध्ये काही मिनिटात होणारा लग्र विधी भारतात मात्र चार ते पाच दिवस चालतो, हे तिच्यासाठी नवीन असल्याचे शान छांग हिने सांगितले. लग्नानंतर बोलताना तिने म्हटलेल्या ‘कसे आहात?’ या आपुलकीच्या शब्दांनी सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. लग्नाचे सर्व विधी संपल्यानंतर काही दिवसांतच राहुल आणि शान छांग पुन्हा चीनला जाणार आहेत. तेथे अजून काही वर्षे योगाचे क्लास घेऊन नंतर पुन्हा भारतात परतण्याचा दोघांचा विचार आहे. चीनच्या मुलीने अगदी खेडेगावातील मुलाशी केलेले लग्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.