जळगाव (प्रतिनिधी) शहरातील निमखेडी शिवारात दुध फेडरेशन रेल्वे गेट तर कचरा डेपोपर्यंत रस्त्याचे काम काही दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजे वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होण्याआधीच रस्त्याला पावलो-पावली तडे पडल्यामुळे या कामाचे पितळ उघडे पडले असून ‘निकृष्ट कामाचा एक उत्कृष्ट नमुना’ बघण्यासाठी अधिकाऱ्यांनी यावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
दुध फेडरेशन रेल्वे गेट तर कचरा डेपोपर्यंत तसेच निमखेडी गावापर्यंत रस्त्याचे काम मागील काही महिन्या पासून सुरु आहे. अति जलद गतीने सुरु असलेल्या या रस्त्याचे काम बहुतांश रात्रीच्या वेळेस करण्यात येत होते. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले’ अशीच काहीशी गंमत झाल्याचे बोलले जात आहे. वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला न होता, अवजड वाहनांची रेलचेल सुरु होण्यापूर्वीच साधारण ८ इंची थिकनेस असलेल्या या रोडवर पावलो-पावली तडे पडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे भवितव्य किती दिवसाचे ?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर काही बांधकाम क्षेत्रातील लोकांनी माहिती दिली की, या रस्त्याच्या कामात वाळू आणि सिमेंट योग्य प्रमाणात न वापरता खडी मशीनची डस्ट अर्थात फफुटा मोठ्या प्रमाणात वापरला गेला असावा. कारण योग्य प्रमाणात वाळू आणि सिमेंटचा वापर झाला असता तर निर्माणाधीन रस्त्याला पडले पावलो-पावली तडे पडलेच नसते.
या रस्त्याचे काँक्रीटीकरण एम १० / एम ३० / एम ४० / एम ५० की त्यापेक्षाही कोणत्या वेगळ्या दर्ज्याचे आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. यामुळेच दोन वर्षानंतर याठिकाणी काँक्रीटीकरण झाले होते का?, याचे अवशेषही कुणाला दिसणार नाही, असेही नाव न सांगण्याच्या अटीवर काही बांधकाम क्षेत्रातील लोकांनी सांगितले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत या रस्त्याच्या बांधकामाचे नमुने घेतल्यास सर्व भांडाफोड होईल.
एवढेच नव्हे तर रस्त्याच्या साईड पट्ट्या मुरूम ऐवजी चक्क बाजूलाच पडलेल्या काळ्या मातीने तयार करण्यात आल्याचेही चित्र याठिकाणी आहे. वाहतुक सुरु होण्याआधीच रस्ता खराब व्हायला लागल्याने त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता अधिकारी कारवाई करतात की, नुसता कारवाईचा फार्स करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात कारवाई न झाल्यास कोट्यावधीचा रस्ता पहिल्याच पावसाळ्यात पाण्यात वाहून गेल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.