बुलढाणा (वृत्तसंस्था) तालुक्यातील भालगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर तब्बल ३ लाख ७० हजारांचा ऐवज लुटण्याची घटना घडली. ही घटना ८ सप्टेंबरच्या रात्री साडेअकरा ते दीड वाजेच्या सुमारास सुमारास घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं ?
भालगाव मार्गावर गजानन माधव परिहार (वय ४६ ) यांचे दुमजली घर आहे. घरामध्ये बहीण, आई, वडिलांसह राहतात. ८ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास बाजूच्या खोलीत झोपलेल्या गजानन यांच्या आईचा चोर, चोर असा ओरडण्याचा आवाज आला. ते खोलीबाहेर आले असता त्यांना जिन्याजवळ सहा दरोडेखोर दिसले. अंगात रेनकोट, तोंडाला रुमाल बांधलेला आणि डोक्यात टोपी घातलेले पस्तीस ते चाळीस वयोगटातील हे धडधाकट शरीरयष्टीचे दरोडेखोर होते.
चाकूचा धाक दाखवून लुटमार !
आरोपींनी परिहार परिवारातील आई, वडील, पत्नी व बहीण यांना घरातील जिन्याच्या बाजूला चाकूचा धाक दाखवून खाली बसविले. आवाज केल्यास ठार मारू, अशा धमक्या दिल्या सहापैकी तीन दरोडेखोर त्यांच्याजवळ थांबले आणि त्यांच्या आईच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, कानातील पाच हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बाळ्या व हातातील ३० हजारांचे चांदीचे कडे हिसकावले. तसेच गजानन यांच्या पत्नी गीता यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजारांच्या दोन सोन्याच्या बाळ्या असा ऐवज जबरीने हिसकावला.
साडेतीन लाखांचा ऐवज लंपास !
पत्र्याची पेटी फोडून त्यातील एक-एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या एकदाण्या, एक तोळ्याची सोन्याची गहुपोत, एक तोळ्याचे सोन्याचे झुंबर, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण ३ लाख १५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे, तसेच एका पेटीतील रोख ३० हजार, लोखंडी कपाटातील ५ हजार पत्र्याची पेटी फोडून त्यातील एक-एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या एकदाण्या, एक तोळ्याची सोन्याची गहुपोत, एक तोळ्याचे सोन्याचे झुंबर, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण ३ लाख १५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे, तसेच एका पेटीतील रोख ३० हजार, लोखंडी कपाटातील ५ हजार असे रोख ३५ हजार आणि बेडरूमधील सॅमसंग कंपनीचा एक दहा हजारांचा टॅब, पाच-पाच हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास केले.
दरोडेखोरांनी तब्बल दोन तास सर्वांना ठेवले ओलिस !
या दरोडेखोरांनी तब्बल दोन तास सर्वांना ओलिस ठेवत घरात दहशत माजविली होती. दरम्यान, फारार होताना ज्या खोलीत सर्वांना डांबले होते. त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता शिवाय कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून मोबाइल देखील लंपास केल्याने पहाटे सव्वा सहा वाजेपर्यंत या कुटुंबास कोणतीही मदत मिळाली नाही. अथक प्रयत्नांनी तार टाकून घराबाहेरील कडी उघडत कुटुंबीयांनी यातून सुटका करून घेतल्यानंतर गावात याबाबत माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले या प्रकरणी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजारी महिलेवर दरोडेखोरांनी दाखवली दया !
सशस्त्र दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांनी घरातील महिलांनाही मारहाण केली. मात्र, त्यांनी एका महिलेवर दयाही दाखवली. घरामध्ये फुफ्फुसाचा आजार असलेल्या मालता परिहार (३५) यादेखील होत्या. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचा जीव गुदमरत होता. त्यांची अस्वस्थता पाहून दरोडेखोरांनी घरामध्ये असलेले ऑक्सिजन सिलिंडर लावत मालता यांचा श्वास मोकळा करून दिला.