फर्रूखाबाद (वृत्तसंस्था) कथितरीत्या भाजप उमेदवारासाठी ८ वेळेस बोगस मतदान केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील एटा जिल्ह्याच्या एका मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला.
निवडणूक आयोगाने संबंधित मतदान केंद्रावरील सर्व सदस्यांना निलंबित करण्याचे आणि या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपवर टीकास्त्र डागत आयोगाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात एटातील खिरिया पमारानच्या मतदान केंद्र ३४३ वर सरपंच अनिल ठाकूर यांच्या सुपुत्राने जवळपास ८ वेळेस भाजपला बोगस मतदान केले. इतकेच नाही तर त्याने याचा व्हिडिओ बनवून सोशल माध्यमावर टाकला. याप्रकरणी राजकीय दबाव वाढल्यानंतर आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. संबंधित मतदान केंद्रावरील सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आणि त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.