जळगाव (प्रतिनिधी) एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. तर पीडिता गर्भवतीसुद्धा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीला आठ महिन्यांपूर्वी एका युवकाने दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. काही दिवस बहिणीकडे राहिल्यानंतर तो मुलीला स्वतःच्या घरी घेऊन आला होता. २५ जुलै २०१२ रोजी सुनीलच्या आई- वडिलांना मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानासुध्दा त्यांनी दोघांचे लग्न लावून दिले. या लग्नाला मुलीच्या आईने नकार दिला होता. याचा राग ठेवून मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीला काही ना काही कारणावरून मारहाण करून शारीरिक मानसिक छळ केला.
दरम्यान, लग्नानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. हा संपूर्ण प्रकार मुलीने तिच्या कुटुंबीयांना सांगितला. अखेर गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे, नणंद, नंदोई यांच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.
















