जळगाव (प्रतिनिधी) आपल्या अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे करीत, तिचा विनयभंग केल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शाहूनगरातील खान्देश मिल कॉलनीत ही मुलगी आपल्या कुटुंबियांसह एका बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास आहे. पिडीत मुलीचे वडील तेथे वॉचमन म्हणून काम करतात. परिसरातील दोघं तरुण गेल्या काही महिन्यांपासून मुलीची छेड काढून तीला त्रास देत होते. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुलीची रस्त्याने जात असतांना दोघांनी तरुणीला आवाज देत मुलीचा हात पकडून तिची छेड काढली.
घाबरलेल्या मुलीने त्याच्या हाताला झटका देवून घराकडे पळाली. तीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. मुलीचे वडील हे त्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेले असता दोघांच्या कुटुंबीयांनी पिडीत तरुणीच्या वडीलांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.
चौघांकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीत त्यांनी लाकडी दांडूका मुलीच्या वडीलांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. मुलीची आई त्यांना वाचविण्यासाठी गेली असता, चौघांकडून त्यांच्यावरही विटा फेकून मारल्या. यामध्ये पिडीत मुलीचे कुटुंबिय जखमी झाले आहे. तरुणीच्या कुटुंबियांना चौघांकडून मारहाण झाल्यानंतर जखमी अवस्थेत तिच्या कुटुंबियांनी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.