अहमदनगर (वृत्तसंस्था) पाच संशयितांनी एकाचा पाठलाग करीत सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारून निघृण खून केल्याची घटना एमआयडीसीजवळील सह्याद्री चौकात घडली आहे. स्टिफन अविनाश मिरपगार (वय ३३, रा. आंधळे-चौरे चौक, नवनागापूर) असे मयताचे नाव आहे.
नवनागापूर येथील स्टिफन मिरपगार हा तरुण मोबाइलवर त्याच्या पत्नीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असताना तो आपलाच व्हिडिओ काढत असल्याचा संशयितांचा गैरसमज झाला. त्यातूनच संशयितांनी रागाच्या भरात त्याचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह ५ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित संग्राम सोन्याबापू कदम (वय १९, रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर) याच्यासह दोन अल्पवयीन आरोपी अशा तिघांना पोलिसांनी रात्री १० वाजता अटक केली असून, संशयित किरण बाळासाहेब गव्हाणे, सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (दोघेही रा. शनी शिंगणापूर, ता. नेवासा) अद्यापही फरार आहेत.
या प्रकरणी मयत स्टिफन मिरपगार याची पत्नी काजल मिरपगार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काजलचा पती स्टीफन सोमवारी (दि.४) मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास सह्याद्री चौक येथील पानटपरीजवळ मोबाइलवर तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता. यावेळी तेथे संशयित संग्राम सोन्याबापू कदम (वय १९, रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर), किरण बाळासाहेब गव्हाणे, सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे यांच्यासह दोन अल्पवयीन असे पाच जणांचे टोळके तेथे आले असता स्टिफन हा त्यांचा व्हिडिओ मोबाइलमध्ये काढत असल्याचा गैरसमज करून घेत त्यांनी स्टिफनशी वाद घालून पाचही संशयितांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो जीव वाचविण्यासाठी पळू लागल्याने संशयितांनी त्याचा पाठलाग करीत त्याच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक फेकून मारले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मयताची पत्नी काजल हिने सोमवारी (दि.१०) रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी करीत आहेत.
मयत स्टिफन याचा मृतदेह दि. ४ जूनला पहाटे सह्याद्री चौकात नगर-मनमाड महामार्गालगत आढळून आला होता. डोक्याला मार असल्याने प्रारंभी तो अपघात असावा, असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनास्थळी कुठल्याही वाहनाची धडक बसल्याचे, तसेच स्टिफनजवळही वाहन नसल्याचे निदर्शनास आल्याने सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि पथकाने सखोल तपास केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे तांत्रिक विश्लेषण करीत गोपनीय महितीही मिळविली. यात त्याचा मृत्यू हा अपघात नव्हे, तर घातपात (खून) असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा माग काढून त्यातील तिघांना ताब्यात घेतले.