पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील गिरड रोड येथील एका मुलीचे लग्न मलकापूर येथील युवकाशी लावून न दिल्याने त्या युवकाने शनिवारी रात्री ११.३० वाजता मुलीच्या घरी येवून “तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी का लावून दिले नाही?” असे विचारत मुलीच्या बापाच्या डोक्यावर पिस्तूल रोखल्याची घडणा घडली आहे. एवढेच नव्हे तर, सोडवासोडव करणाऱ्यावर चाकूने वार देखील करण्यात आलेत.
पाचोरा शहरातील गिरड रोड वरील हनुमान मंदिर भागात राहत असलेल्या अरुण शिवाजी यादव (वय – ५२, धंदा – मजुरी) यांच्या भावाची मुलगी मलकापूर, जि. बुलढाणा येथे दिलेले असून अरुण यादव यांच्या मुलीसाठी त्यांच्या मलकापूर येथील भावाच्या मुलीचा दिर रोहित राजु सोनवणे (रा. शिवाजी नगर, मलकापूर) याने आठ महिन्यांपूर्वी मागणी घातली होती. मात्र अरुण यादव यांनी त्यांच्या मुलीचा विवाह कृष्णापूरी (पाचोरा) येथील मुलाशी लावून दिला. त्याचा राग रोहित सोनवणे याने मनात ठेवून दि. ३ सप्टेंबर शनिवारी रात्री ११:३० वाजता अरुण शिवाजी यादव यांचे घरी येवून “तु मला तुझी मुलगी का दिली नाही” ? असे संबोधून त्याचे डोक्यावर पिस्तोल लावले. ही घटना बघताच घरच्या मंडळींनी आरडाओरडा केली. याच परीसरात जवळच रहात असलेल्या अरुण यादव यांचा मोठा जावाई गोकुळ पाटील यास भांडणाचा आवाज गेल्याने तो पळत येत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोहित सोनवणे यांचे साथीदाराने त्यांच्या छातीवर धारदार चाकूने वार करत गोकुळ पाटील यांना गंभीर जखमी केले.
दरम्यान, परीसरातील लोक जमा होत असल्याचे निदर्शनास आल्याने रोहित सोनवणे व त्याचे दोन्ही साथीदारांनी मोटारसायकल घटनास्थळीच सोडून पसार झालेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौभे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार निवृत्त मोरे, योगेश पाटील हे पोहचण्याच्या आगोदर आरोपी पसार झाले होते. रोहित सोनवणे हा अरुण यादव यांच्या जावायाचा भाऊ असल्याने त्यांनी तक्रार देण्यावर रात्रभर विचार केला व दूसऱ्या दिवशी रविवारी रोहित आणि त्याचे दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक जितेंद्र वल्टे व पोलिस काॅन्स्टेबल भगवान बडगुजर हे करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक मलकापूर येथे पाठविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी सांगितले आहे.