अहमदनगर (वृत्तसंस्था) राहुरी तालुक्यातील मानोरी येथे सेवानिवृत्त शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मयत शिक्षकाची सुन, तिचा प्रियकर आणि इतर दोघेजण अशा चार जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच बरबडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सोन्याबापू बाबुराव बरबडे (रा. मानोरी, ता. राहुरी) यांनी दि.२२ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मयत सोन्याबापू बरबडे यांची सुन, तिचा प्रियकर आणि सुनेच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळूनच बरबडे यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले.
बरबडे यांचा मुलगा शिवाजी बरवडे हा व्यवसायानिमित्त पुणे येथे राहत होता. त्याचा विवाह आरडगाव येथील ढेरे कुटुंबातील विशाखाशी झाला होता. विवाहनंतर काही दिवस त्यांचा सुखाचा संसार झाला. त्यातून त्यांना दोन मुली देखील झाल्या आहेत. मात्र गेल्या वर्षापासून पुणे यथे त्यांच्या सुनेचे तेथीलच विजयकुमार चव्हाण यांच्या सोबत प्रेमसंबंध सुरु झाले. त्यानंतर विशाखा ही आपल्या दोन मुलीला घेऊन सोन्या-चांदीच्या दागिण्यासह पैसे घेऊन विजयकुमार सोबत पळून गेली होती. तसेच वेळोवेळी तिच्या पतीला व तिच्या सासऱ्याला पैशाची मागणी करुन त्रास देत होती. त्यात तिला तिच्या माहेरचे लोक व तिचा प्रियकर देखील मदत करत होता.
घटस्फोटासाठी अर्ज करूनही विशाखा घटस्फोट देत नव्हती बरबडे यांना फोन करून तुमच्या मुलाचा काटा काढून तुमची सर्व संपत्ती आम्ही हडप करणार आहोत. आम्ही तूझे तुकडे करुन टाकू, अशा वारंवार धमक्या देत होती. या धमक्यांना घाबरून सोन्याबापू बरबडे यांचा मुलगा शिवाजी सोन्याबापू बरबडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी व्याही चंद्रभान राधाकृष्ण ढेरे, चुलत व्याही संजय राधाकृष्ण ढेरे, (दोघे रा. आरडगाव, ता. राहुरी) तसेच सुन विशाखा शिवाजी बरबडे व तीचा प्रियकर विजयकुमार विलास चव्हाण दोघे (रा. कृष्णानगर, चिंचवड, पुणे) या चार जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोपट कटारे हे करत आहे.
















