भुसावळ (प्रतिनिधी) भरधाव चारचाकी वाहन दुभाजकावर आदळल्याने चालक देवेंद्र जालंदर पवार (वय २१, रा. साक्री फाटा, भुसावळ) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना बुधवार दि. १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली.
देवेंद्र पवार हा तरुण नोकरीस होता. बुधवार दि. १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता तो (एमएच १९, सीवाय ९६१६) क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने भुसावळ येथून दीपनगर येथे जाण्यासाठी निघाला. दरम्यान, दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन दुभाजकावर आदळले.
यात देवेंद्र यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी घटनेची माहिती मिळाल्यानंतर मित्र परिवार व नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.