जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर दुचाकी दुभाजकावर आदळून दोन मित्र चारचाकी वाहनाच्या खाली येवून ठार झाल्याची दुर्देवी घटना आज (शनिवार) दुपारी घडली. मयूर विठ्ठल लंके-साळूंखे (वय १८, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (१९, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.
जळगावातील मित्राला भेटून मयूर आणि दीपक दुपारी १ वाजेच्या सुमारास हे घराकडे निघाले होते. गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर अचानक दुभाजकावर दुचाकी आदळल्यानंतर दोघे रस्त्याच्या दुस-या बाजूच्या रस्त्यावर फेकले गेले आणि दुस-याच क्षणी ते चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले. यात मयूर याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक याचा खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, याबाबत सुनील विलास कोठवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोणत्या तरी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर दोघं तरुण आपल्या कारच्या बोनेटवर आदळले.