जालना (वृत्तसंस्था) भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने सासुरवाडीकडे जाणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अंबड घनसावंगी तालुक्यातील ढालसखेडा मार्गावरील बोधलापुरी शिवारात घडली.
किशोर दिलीप कारके (वय २६, रा. अंबड), असे मयत युवकाचे नाव आहे. अंबड शहरातील साठेनगर भागात राहणारा किशोर कारके हा रविवारी दुपारी दुचाकीवरून (क्र. एमएच २१ बीएस ५६१२) त्याच्या सासुरवाडीकडे निघाला होता. त्याची दुचाकी अंबड-घनसावंगी मार्गावरील बोलधापुरी शिवारात आली असता भरधाव कारने (क्र. यूपी १६ आर ६६४४) दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात किशोर कारके हा गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल केला. त्याचवेळी या घटनास्थळावर माजी मंत्री आ. राजेश टोपे आले. त्यांनी उपस्थितांच्या मदतीने तातडीने जखमीला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले; परंतु, डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.