बुलढाणा (वृत्तसंस्था) मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या वडीलांच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात लग्न पत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बुलडाणा-मोताळा मार्गावरील मूर्ती फाट्याजवळ घडली.
मोताळा तालुक्यातील कुन्हा गोतमारा येथील काशीराम मंझा (वय ५२) यांच्या मुलीचे लग्न अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. घरात लग्नाची तयारी सुरू होती. पत्रिका वाटण्याचा कार्यक्रम ठरल्या त्यानुसार मंझा मुलीच्या लग्नाची पत्रिका नातेवाइकांना देण्यासाठी आपल्या (एम. एच. २८/ एजी / ६९९) या क्रमांकाच्या दुचाकीने खेरखेडा येथे गेले होते.
नातेवाइकांना पत्रिका देवून ते परत येत असताना मूर्ती फाट्याजवळ त्याच्या दुचाकीला बुलडाण्याकडून मोताळ्याकडे भरधाव येणाऱ्या (एम.एच. ३० / एल / २४६५) या क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात काशीराम मंझा हे ट्रक खाली सापडल्याने गंभीर जखमी झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लग्नाच्या दोन दिवसा अगोदरच वडीलांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे लग्न घरी एकच शोककळा पसरली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.