पाचोरा (प्रतिनिधी) शेतात वखर चालवतांना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटल्याने वखरला वायरच्या तारांचा स्पर्श झाल्याने विजेच्या जबर धक्क्याने एका १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील प्रमोद विष्णू जंजाळ (वय १७), असे मयत तरुणाचे नाव आहे. एकुलता एक मृतदेह बघताच आई, वडिलांनी मोठा आक्रोश केला होता.
सोयगाव तालुक्यातील वणगाव येथील प्रमोद जंजाळ हा होतकरू तरुण शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. २८ जून रोजी सकाळी शेतात वखर चालवायचे असल्याने आई, वडिल व प्रमोद हे शेतात गेले होते. दरम्यान, प्रमोद हा शेतात लोखंडी वखर चालवत असताना त्यांच्या शेतातून शेजारील शेतासाठी विजेची वायर जमिनीवरुन टाकण्यात आली होती. ही वायर प्रमोद याच्या निदर्शनास आली नाही. नेमके वखरमुळे ही वायर तुटली व वायरच्या तारांचा स्पर्श वखरला झाला. तर प्रमोद याच्या हातात वख्खरचा दांडा असल्याने त्यास विजेचा जबर धक्का लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
शेजारी काम करणाऱ्या लोकांच्या घटना लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रमोद यास तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमोद यास मृत घोषित केले. या वेळी आई, वडिलांनी मोठा आक्रोश केला. विष्णू जंजाळ यांना प्रमोद हा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जमिनीवरुन वायर टाकल्यानेच निष्पाप मुलाचा जीव गेला !
शेजारच्या शेतकऱ्याने विष्णू जंजाळ यांच्या शेतातून थेट जमिनीवरुच विजेची वायर टाकल्याने माझ्या निष्पाप मुलास जीव गमवावा लागल्याची माहिती माध्यमांशी बोलताना विष्णु जंजाळ यांनी स्वतः दिली. मयत प्रमोद याच्या पश्चात्य आई, वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. कष्टाळू व मेहनती तसेच अभ्यासात हुशार अशा प्रमोदच्या अकस्मात मृत्यूने वणगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस ठाण्यात वर्ग केली आहे.