जळगाव (प्रतिनिधी) रात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्यांच्या घरातून दोन लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरुन नेले होते. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित त्या अल्पवयीन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
शहरातील नशेमन कॉलनीत तन्वीर मजहर पटेल हे वास्तव्यास असून दि. १८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातून २ लाख रुपये किंमतीचे तीन महागडे मोबाईल चोरुन नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर, योगेश बारी, योगेश घुगे यांचे पथक तयार केले.
सीसीटीव्ही फुटेजवरुन आवळल्या मुसक्या
पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक अल्पवयीन मुलगा संशयास्परित्या फिरतांना दिसला. त्यानुसार पथकाने त्या मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले तीन मोबाईल देखील काढून दिले.