जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ६६ वर्षांपुर्वीची जीर्ण झालेली तीन मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगर परिसरातील अमर चौकात घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने राजश्री सुरेश पाटक (वय-६६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनासह, महापालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा बचाव कार्य करीत होते. सुमारे पाच तासानंतर वृद्ध महिलेचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. यावेळी वृद्धेच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
शिवाजी नगर परिसरातील अमर चौकात घडली घटना !
शहरातील शिवाजी नगर परिसरातील अमर चौकात राजश्री पाठक यांच्या मालकीची इमारत होती. या इमारतीमध्ये त्यांची बहिण काही वर्षांपूर्वी क्लासेस घेत होत्या तर खालच्या मजल्यावर पाठक या वास्तव्यास होत्या. परंतु पाठक यांचे मोठा मुलगा पुणे तर लहान मुलगा नाशिक येथे वास्तव्यास आहेत. तसेच त्यांची मुलगी प्राजक्ता पाठक या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात नोकरीला असून त्या आयवाय पार्कमध्ये वास्तव्यास असून त्यांची आई राजश्री पाठक या त्यांच्याचकडे राहत होत्या. नेहमीप्रमाणे राजश्री पाठक या सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास देवपूजा आणि नळाचे पाणी भरण्यासाठी शिवाजीनगरातील आपल्या घरी आल्या होत्या.
देवपुजा करीत असतांना अचानक इमारत कोसळली !
देवपुजा करीत असतांना अचानक त्या राहत असलेली तीन मजली इमारत कोसळली आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. इमारत कोसळल्याची माहिती महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला मिळताच अवघ्या काही मिनिटात संपुर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बवाच कार्याला सुरुवात झाली. यावेळी महापालिका प्रशासनाकडून पाच जेसीबी, चार ट्रॅक्टर, अग्नीशमन दल, दोन रुग्णवाहिका, आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल होवून बचाव कार्याला सुरुवात झाली.
अधिकारी घटनास्थळी दाखल !
शिवाजीनगरात इमारत कोसळल्याची घटना वाऱ्या सारखी पसरल्याने घटनास्थळी डीवाएसपी संदीप गावित, एलसीबीचे पोलीस निरीक्षक नजन किसन पाटील व शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, एपीआय रवींद्र बागुल, सपोनि किशोर पवार, क्युआरटी पथक, शहर व एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पाच तासानंतर बाहेर काढला मृतदेह !
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत चार जेसीबीच्या सहाय्याने इमारतीमधील ढिगारा उपसण्याचे कार्य सुरु होते. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास बचाव कार्य करणाऱ्या पथकाला राजश्री पाठकया ढिगा-याखाली दबलेल्या दिसून आल्या. त्यानंतर बचाव पथकाकडून काम वेगाने सुरु ठेवून दुपारी १.४५ वाजता वृद्धेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर महिलेला तात्काळ शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. याठिकाणी महिलेची तपासणी करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषीत केले. उद्या दि. ३० ऑगस्ट रोजी त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजश्री पाठक यांच्या पश्चात मुलगा संदेश पाठक, सुयोग पाठक, मुलगी प्राजक्ता पाठक, सून भावना पाठक असा परिवार आहे.
पालकमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी !
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी १०.३० वाजता घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका गायत्री शिंदे यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यानंतर माजीमंत्री गुलाबराव देवकर, सहकार विभागाचे वाल्मीक पाटील, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी घटनास्थळी भेट देवून त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
मोठी दुर्घटना टळली !
शिवाजी नगरात झालेल्या दुर्घटनाग्रस्त इमारत ही तीन मजली होती. परंतु याठिकाणी कोणीही वास्तव्यास नव्हते..राजश्री पाठक या दररोज याठिकाणी पुजा करण्यासाठी तसेच नळाचे पाणी भरण्यासाठी येत होत्या. नेहमीप्रमाणे आज देखील त्या पुजा करण्यासाठी आल्या आणि काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या इमारतीमध्ये कोणाचाही रहिवास मोठी दुर्घटना टळली. जळगाव शहरातील इतर जीर्ण इमारतींच्या बाबतीत मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पाऊले न उचलल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.