पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील वाडी येथील शेतकऱ्यांचा ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या ठगास पाचोरा पोलिसांनी नवसारी येथून अटक केली आहे. राजेंद्र भीमराव पाटील (३४, रा. वाडी- शेवाळे ता. पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
गेल्या वर्षी वाडी – शेवाळे आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाख रुपये किंमतीचा कापूस उधार खरेदी करून तो पसार झाला होता. कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. पैसे परत मिळावेत, यासाठी वाडी येथील शेतकऱ्यांनी अनेक दिवस उपोषणही केले होते.
राजेंद्र हा नवसारी (गुजरात) येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नवसारी येथे पोलीसांचे पथक रवाना झाले होते. तिथून त्याला अटक करुन पिंपळगाव येथे आणण्यात आले. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय अमोल पवार, मुकेश लोकरे, जितेंद्र पाटील, रणजीत पाटील, शिवनारायण देशमुख, उज्वल जाधव, अभिजीत निकम, प्रवीण देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.