अमरावती (वृत्तसंस्था) शेतशिवारात बकऱ्या चारायला गेलेल्या एका शेतमजूर तरुणीवर वाघाने हल्ला चढविला. त्यात तरुणी जखमी झाली. तत्पूर्वी वाघाने दोन बकऱ्यांचाही फडशा पाडला. ही घटना मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास धारणी तालुक्यातील दादरा शिवारात घडली. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गीता शुकलाल धांडे (१७) रा. दादरा असे जखमी शेतमजूर तरुणीचे नाव आहे. गीता ही मंगळवारी नेहमीप्रमाणे शिवारात बकऱ्या चारायला गेली होती. यावेळी वाघाने दोन बकऱ्यांचा फडशा पाडला. त्यानंतर वाघाने अचानक गीतावर हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिने मदतीसाठी आरडाओरड केल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यामुळे वाघाने तेथून धूम ठोकली. त्यानंतर घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देऊन जखमी गीताला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेनंतर वन विभागाच्या पथकासह पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.