नागपूर (वृत्तसंस्था) खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला. अपघात इतका भयावह होता की, मृतक वाहनात अडकून ५० फुटांपर्यंत फरपटत गेला. ही घटना बुधवारी (२३ ऑगस्ट) सकाळी आठ वाजेच्या सुमाराची आहे. मृतकाचे नाव विकास भीमराव कुंभरे (१८, म्हारकुंड, खापा सावनेर), असे आहे.
विकास हा काही कामानिमित्त दुचाकी क्रमांक (एमएच ४० / बीटी ३८५६) ने म्हारकुंड येथून खापा येथे जात होता. दरम्यान, बावनगाव फाट्याजवळील वळणावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने विकासच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खापा पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर रुग्णालयात हलविला. खापा पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध भादंविच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.