जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिरासमोरील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.
विकास भास्कर पाटील (वय ४२ रा. शिवदत्त कॉलनी, चंदू आण्णानगर परिसर,) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विकास पाटील हे मित्राच्या भेटीसाठी पाळधीकडे जात होते, त्यातच ही दुर्देवी घटना घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, मूळ चोपडा तालुक्यातील सनपुले येथील रहिवासी विकास पाटील हे नोकरीच्या निमित्ताने चार ते पाच वर्षापूर्वी जळगावात स्थायिक झाले आहेत. कुटुंबासह ते जळगाव शहरातील चंदूआण्णा नगर परिसरातील शिवदत्त कॉलनी येथे भाडे करारावरील खोलीत वास्तव्यास होते. एमआयडीसीतील सिध्दार्थ कार्बो या कंपनीत ते कामाला होते. आज मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विकास पाटील हे बँकेच्या कामानिमित्ताने घराबाहेर पडले. बॅकेत काम आटोपून ते त्यांच्या दुचाकी क्र.एम.एच.१ सी.एल.१८९० ने कंपनीतील मित्राला भेटण्यासाठी पाळधीकडे जात होते. पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकले, यानंतर ते मित्राकडे जात असतांना पाळधी गावातील साईबाबा मंदिरासमोर महामार्गावर अज्ञात वाहनाने विकास पाटील यांना चिरडले. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला होता. याप्रकणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.