धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव येथे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जयंती व वसंत पंचमीच्या पावन पर्वानिमित्त समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा तसेच समस्त नाथभक्त परिवार धरणगाव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता लहान माळीवाडा, धरणगाव येथे भव्यदिव्य जाहीर कीर्तन सोहळा अतिशय प्रसन्न व भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कीर्तन सोहळ्यात नवनाथ कथाकार ह.भ.प. गणेश महाराज कुदळे (श्री दत्त देवस्थान;श्रीक्षेत्र चिंचोळी, अहिल्यानगर) यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी कीर्तनातून संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य, अभंगगाभा व भक्तीमार्गाचे तत्त्वज्ञान अत्यंत रसाळ शब्दांत उलगडून दाखविले. तत्पूर्वी कीर्तनकार महाराज, बालकनाथजी महाराज व समस्त नाथभक्तांनी संतोष महाजन यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर गुरुवर्य बालकनाथ महाराज यांची घोडाबग्गीच्या माध्यमातून सवाद्य मिरवणूक नाथभक्तांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाली. भवानी नगर – मरीआई – नवेगाव – लहान माळीवाडा मार्गावरून आलेल्या मिरवणुकीत अनेक महिला भगिनींनी गुरुवर्यांचे औक्षण केले तसेच अनेक नाथभक्तांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतलेत.
कीर्तनाच्या दरम्यान त्यांनी नवनाथ संप्रदायाची उज्ज्वल परंपरा, आद्य नवनाथ श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा दिव्य जन्म व तपश्चर्येचे प्रसंग, गुरु-शिष्य परंपरेतील नवनाथांचे कार्य तसेच लोककल्याणासाठी केलेली साधना यांचे हृद्य वर्णन केले. नवनाथ महाराजांच्या जीवनातील संन्यास, नामस्मरण व योगमार्गाचे प्रेरणादायी प्रसंग कथन करून त्यांनी भाविकांना अध्यात्मिक उंचीवर नेले.
यावेळी नवनाथ संप्रदायावर आधारित भक्तीपर गीते, नामघोष, अभंग व नाथपंथीय पदे सादर करण्यात आली. “नाथा रे नाथा”, “अवधूता अवधूता” यांसारख्या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर नामस्मरणाने दुमदुमून गेला व उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले.
कार्यक्रमास भजनी मंडळ श्री संतकृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांनी सुरेल अभंग – भजनांची साथ दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून परमपूज्य गुरुवर्य बालकनाथजी महाराज, संस्थापक अध्यक्ष – श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम; नवनाथ नगरी, कोळपिंप्री यांची उपस्थिती लाभली. त्यांनी नवनाथभक्ती, संप्रदायाचे सामाजिक व आध्यात्मिक कार्य तसेच कलियुगात नामसाधनेचे महत्त्व यावर मोलाचे मार्गदर्शन केले. जीवब्रम्ह सेवेचे व्रत घेऊन मार्गक्रमण करा म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यात्माचे कार्य घडेल असे प्रतिपादन बालकनाथजी महाराजांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समस्त कुणबी पाटील समाजाचे खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी केले आभार प्रदर्शन समाजाचे संचालक श्री गणेश पाटील यांनी मानले. याप्रसंगी ह.भ.प.गणेश महाराज कुदळे व परमपूज्य बालकनाथजी महाराज यांचा शाल – श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यासोबतच ह.भ.प. नाना महाराज, सुभाष नाना कोळपिंप्री, गायनाचार्य नवनाथ महाराज कदम, मृदूंगाचार्य विशाल महाराज नवघरे, विणेकरी ह.भ.प. दिपक महाराज, गायनाचार्य चैताली तोडमल – ज्ञानेश्वरी बेल्हेकर – चांदणी थोरात यांचा देखील शाल – श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच समस्त नाथभक्त परिवार धरणगाव ग्रुप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुकोबांची जयंती व वसंत पंचमीच्या निमित्ताने आयोजित अलौकिक कीर्तन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिभावपूर्ण व अध्यात्मिक वातावरणात पार पडून उपस्थित भाविकांच्या मनावर अविट छाप उमटवून गेला. कार्यक्रमाला गावातील व परिसरातील नाथभक्त महिला – पुरुष – अबालवृद्ध तसेच बालगोपाल यांची लक्षणीय उपस्थिती होती. कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच समस्त नाथभक्त परिवार धरणगाव ग्रुप यांनी मोलाचे सहकार्य केले.














