चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेले येथील रहिवासी असलेला व पुण्यातील सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे खासगी कंपनीत कामाला असलेला ३७ वर्षीय मेकॅनिकल इंजिनियर सोमनाथ धर्मा पाटील याचा अमेरिकेतील मेक्सिको शहरात ३० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, सोमनाथ पाटील याच्या मृत्युची वार्ता वेले गावात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, ३ दिवस उलटूनही त्यांचे शव ताब्यात मिळत नसल्याने नातेवाईक आक्रोश करत आहेत.
वेले येथील मूळ रहिवासी असलेला सोमनाथ धर्मा पाटील हे पुणे येथील एका खासगी कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कामाला होते. ते पुण्यातील सिंहगड परिसरात राहत होते. त्यांना पत्नी, मुलगा, मुलगी, ३ बहिणी व आई, वडील असा परिवार आहे. ते कंपनीच्या कामानिमित्त अमेरिकेतील मेक्सिको शहरात गेलेले होते.
दरम्यान, ३० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमाराला सोमनाथ पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते रूमवर मृत अवस्थेत मिळून आले. कंपनीच्या कामगारांनी त्यांची चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली. त्यानंतर ही दुःखद वार्ता त्यांनी त्यांच्या पत्नीला व आई-वडिलांना सांगितली. ही दुःखद निधनाची वार्ता ऐकताच परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर कंपनीच्या कामगारांनी मृत सोमनाथ यास मायदेशी गावी आणण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी यासाठी ७२ तास उलटले असले तरी ही त्यांचे शव मिळत नसल्याने परिवार शोक सागरात बुडाला आहे. दरम्यान, सोमनाथ पाटील यांचे वडिल धर्मा पाटील हे वेले गावात शेती करुन आपला चरितार्थ चालवत होते. आता केवळ सांत्वन करण्याइतकेच काय ते नातेवाईकांच्या हाती आहे. सोमनाथ पाटील हे कंपनी कामगारातील उच्चश्रेणी कामगार होता. मेकॅनिकल इंजिनियर असून ही ते अनेक देशांमध्ये कंपनीच्या कामानिमित्त ये-जा करत असत. तर त्यांची पत्नी कल्पना व एक मुलगी, मुलगा पुणे येथील शाळेत शिकत आहेत.