जळगाव (प्रतिनिधी) न्यायालयात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी मागितलेले पैसे देण्यास नकार दिल्याने दिनेश रवींद्र बारी (वय २७, रा. हरिविठ्ठल नगर) यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या भावासह आईलाही मारहाण करीत उकळते दूध अंगावर टाकले. ही घटना दि. ८ डिसेंबर रोजी हरिविठ्ठल नगरात घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हरिविठ्ठल नगरात दिनेश बारी वास्तव्यास आहे. ते घरी जात असताना किर्ती शिवाजी बारी हिने कोर्टात दाखल केस मागे घेण्यासाठी पैशांची मागणी केली. त्या वेळी नकार दिल्याने महिला व तिच्या मुलाने शिवीगाळ करीत लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. दिनेश हे घराकडे पळत गेले असता त्यांचा महिलेसह तिचा पती शिवाजी मुरलीधर बारी व मुलगा हे त्यांच्या मागे जाऊन घरात घुसले व तिघांनी मिळून त्यांना मारहाण केली. त्या वेळी दिनेश यांचे भाऊ शिरीष बारी भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. तसेच दिनेश यांच्या आईसह शिरीष यांच्या अंगावर उकळते दूध टाकले. त्यामुळे ते भाजून गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी दिनेश बारी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किर्ती बारी, शिवाजी बारी व त्यांचा मुलगा अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहेत.