छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) दारू पिण्यासाठी तरुणाने खिशातील पाचशे रुपये न दिल्याने तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. गुप्तांगावरही लाकडी दांड्याने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान १७ ऑगस्टला मृत्यू झाला. अजिंक्य राजेश ठोंबरे (२१ रा. रमानगर) असे मयताचे नाव आहे.
गेल्या शनिवारी रात्रीच्या सुमारास रमानगर भागात हा गंभीर प्रकार घडला. शनिवारी अजिंक्य उस्मानपुऱ्यात मित्रांसोबत बाहेर उभा होता. त्यास त्याच्या ओळखीच्या चेतन बाळू कांबळे व त्याच्या दोन मित्रांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावर अजिंक्यने नकार दिला. यामुळे तिघांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. चेतनचे वडील बाळू कांबळे, आई, आजी अशा एकूण आठ जणांनी त्याला बेदम मारहाण केली.
मारहाणीत अजिंक्यच्या गुप्तांग व श्वसननलिकेवर जबर मारहाण झाल्याने त्याला तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत असल्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रियादेखील केली. मारहाण इतकी गंभीर होती की त्याचे संपूर्ण शरीर सुजले होते. मात्र, उस्मानपुरा पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. गंभीर मारहाणीची घटना लपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोपही संतप्त नातेवाइकांनी केला.
गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली असून रात्री उशीरापर्यंत उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. अजिंक्य हा मजुरी करतो. त्याची आई ही अंगणवाडी सेविका असून वडील शेती करतात. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.