चंद्रपूर (वृत्तसंस्था) चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळेच, आमचा दारुविक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. जो तुम्हाला जगवतो, तोच खरा देव असतो, असे म्हणत चंद्रपूरमधील एका दारुविक्रेत्याने दारुबंदी उठविल्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोचे औक्षण करुन आरतीही केली.
सहा वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यात मद्यालय सुरू झाली आहेत. दारूविक्री सुरू होताच मद्य विक्रेत्यांनी आपआपल्या पद्धतीने हा आनंद साजरा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री उठविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची राहिली आहे. त्यामुळे एका बार मालकाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बियर बार मध्ये लावून त्यांची आरती केली.
चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षे दारुबंदी होती. दारुबंदी करण्यासाठी काही कारणे दिली गेली तर ती उठविण्यासाठी देखील काही कारणांचा आधार देण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष दारुबंदीची निर्बंधे हटल्यानंतर जिल्हा प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी ठाकणार आहेत. येथील दारुबंदी उठवल्यानंतर सरकारला सर्वसामान्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. मात्र, येथील दारुविक्रेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
जो तुम्हाला जगवतो, तोच खरा देव असतो
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळेच, आमचा दारुविक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. जो तुम्हाला जगवतो, तोच खरा देव असतो, असे म्हणत चंद्रपूरमधील एका दारुविक्रेत्याने दारुबंदी उठविल्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोचे औक्षण करुन आरतीही केली.