भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना महामारीचा फटका अनेकांना बसला असून कराचा भरणा करण्यासाठी लोक पुढे येत नाही, अशावेळी भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीने एक अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवलीये. ती म्हणजे कराचा भरणा केला तर ग्रामस्थांना एक तोळे सोन्याची चैन, एक ग्राम वजनाची सोन्याची नथणी आणि बरेच काही मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीने कर भरणाऱ्या ग्रामस्थांना विविध सवलती देण्यासह ‘सुवर्ण बक्षीस’ नावाची एक योजना जाहीर केली आहे. साकेगाव हे साधारणपणे १५ हजार लोकवस्तीचे गाव. येथील ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी सातत्याने अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. परंतु, कोरोना महामारीच्या काळात ग्रामस्थांकडून कराचा भरणा करण्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने विकासकामे करण्यात ग्रामपंचायतीला अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना, गावात विकासकामे करणे, कर्मचाऱ्यांचे पगार देणे, अशा पातळ्यांवर कसरत होत होती. म्हणून ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने कर वसुलीसाठी सुवर्ण बक्षीस योजनेची संकल्पना पुढे आली.
साकेगाव ग्रामपंचायतीने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ चा संपूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी 5 टक्के सूट जाहीर केली आहे. एवढेच नव्हे तर, संबंधित ग्रामस्थाच्या कुटुंबाला वर्षभर दररोज २० लीटर मोफत आरोचे फिल्टर पाणी देण्यात येणार आहे. तसेच, १२ ते ३१ मे २०२१ दरम्यान संपूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी एक ‘लकी ड्रॉ’ योजना आखण्यात आली आहे. त्यात पहिले बक्षीस १० ग्रॅम सोन्याची चैन, द्वितीय बक्षीस एक ग्रॅम सोन्याची नथणी, तृतीय बक्षीस ५ पैठणी साड्या, त्याचप्रमाणे ५० पाण्याचे जार (प्रत्येकी एक) उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून कर भरणाऱ्या ग्रामस्थांना वाटप करण्यात येणार आहेत. या शिवाय १० हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला पाण्याचा १ जार भेट म्हणून देण्यात येत आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी भरणाऱ्या ग्रामस्थांना करात ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी कर भरणाऱ्या प्रत्येकाला एक डस्टबिन मोफत देण्यात येत आहे. घरातील कचरा या डस्टबिनमध्ये टाकून तो दररोज घंटागाडीत जमा करावा, असे आवाहन केले जात आहे.
३१ मे रोजी सुवर्ण बक्षीस योजनेची मुदत संपणार आहे. त्यानंतर १ जून रोजी ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यात कोणाला काय बक्षीस मिळते? याची ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सर्वांचे लक्ष एक तोळे सोन्याच्या चैनीकडे लागले आहेत.