चाळीसगाव (प्रतिनिधी) घरालगत होत असलेल्या सार्वजनिक शौचालाचे बांधकाम रद्द करावे, या मागणीसाठी करगाव येथील भिकन बाजीराव देवरे हे उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत.
करगाव येथे भिकन बाजीराव देवरे यांच्या घरालगतच मागच्या बाजूला ग्रामपंचायत बांधीत असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा आपल्याला व आपल्या कुटुंबियांना तसेच आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधी आणि घाणीला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे हे सार्वजनिक संडास इतरत्र बांधावेत अशी विनंती त्यांचे पुत्र डॉ. सुवर्णसिंग भिकनराव राजपूत यांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात ग्रामपंचायत करगाव तसेच पंचायत समिती चाळीसगाव गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांची मागणी व विनंती यास प्रतिसाद न देता ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्या संगणमताने त्यांच्या घरालगत होत असलेल्या सार्वजनिक संडासाच्या बांधकामाच्या विरोधात भिकन देवरे हे आपली पत्नी रमलबाई देवरे यांच्यासह दि. ७ मार्च पासून शौचालय बांधत असलेल्या जागेच्या ठिकाणी उपोषणास बसणार असून तसे निवेदन त्यांनी पंचायत समिती चाळीसगाव गटविकास अधिकारी यांना दिले असून त्यांचा मागणीचा विचार व्हावा, अशी त्यांची विनंती आहे.
आपल्या घरापासून काही अंतरावरच आता आधीपासूनचे सुरू असलेले सार्वजनिक संडास आहेत. त्याच्या दुर्गंधीचा त्रास आम्हाला आधीच होत असताना आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या घराच्या जवळच पुन्हा नव्याने सार्वजनिक संडास बांधण्याचे नियोजन ग्रामपंचायत करगाव यांनी हेतू पुरस्काररित्या आम्हाला त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून केले आहे. याच ठिकाणी आमचे स्वयंपाक घर आणि रहिवास असल्याने हे सार्वजनिक संडास या ठिकाणी बांधू नयेत, अशी विनंती वारंवार आम्ही करून देखील आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहेत. गटविकास अधिकाऱ्यांना देखील याबाबत लेखी स्वरूपात व प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे. त्यांनी देखील आमच्या मागणीचा कुठलाही विचार न करता या कामास परवानगी दिली असून यामुळे भविष्यात आम्हाला प्रचंड दुर्गंधी आणि रोगराईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे हे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम त्वरित रद्द करून इतरत्र हलवावे. अन्यथा आम्ही आमरण उपोषणास उद्यापासून बसत आहोत, असे त्यांनी पत्रकार द्वारे कळविले आहे.