चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पातोंडा या गावाची लाईट गेल्याच्या कारणावरून काही लोकांनी शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे काही कर्मचारी तालुक्यातील पातोंडा येथे प्रदिप सुरेश आमले व काही सहकारी गावाचे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभे राहुन थकबाकीची यादी चेक करीत होते. तेथे संशयित आरोपी ज्ञानेश्वर भिला चौधरी याने राकेश सूर्यवंशी (वय ३८,धंदा – नोकरी लाईनमन) हे सरकारी कर्तव्य बजावत असतांना लाईट गेल्याचे कारणावरुन त्यांना उजव्या कानावर हाता चापटांनी मारले, तसेच धक्काबुक्की करुन अरेरावी करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी संशयित आरोपी ज्ञानेश्वर भिला चौधरी, दिपक लक्ष्मण पाटील, एकनाथ निंबा पाटील यांच्यासह इतर ८ ते १० अनोळखी लोकांविरुद्ध राकेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी दिपक बिरारी हे करीत आहेत.