जळगाव (प्रतिनिधी) बस वडिलांच्या नावावर हस्तांतरणासाठी दहा हजार रूपयांची लाच मागणाऱ्या दोन आरटीओ एजंटांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. या दोघांना अटक केल्याने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली होती.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने प्रवासी बस विकत घेतली असून ही बस त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावावर हस्तांतर करावयाची होती. यासाठी आरटीओ कार्यालयातील एजंट शुभम चौधरी व राम पाटील या दोघांनी तक्रारदाराला दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री व पडताळणी करून मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ कार्यालयात सापळा रचून दहा हजारांची लाच घेताना शुभम राजेंद्र चौधरी (वय २३, रा. कोल्हे हिल्स, जिजाऊनगर जळगाव) याला रंगेहाथ पकडले. तक्रारीनुसार शुभम चौधरीचा साथीदार आरटीओ एजंट राम भीमराव पाटील (वय ३७, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, महावळ जळगाव) यालाही अटक करण्यात आली आहे.