नाशिक (वृत्तसंस्था) वीज मीटर बसवून दिल्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वाडीवर कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ व त्याचा खासगी साथीदार अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. ३०) पकडले.
संशयित वरिष्ठ तंत्रज्ञ नागेश्वर रघुनाथ पेंढारकर (वय ३५) व शुभम रामहरि जाधव (वय (२३) या दोघांनी एका तक्रारदाराकडून दोन कमर्शियल व एक घरगुती वीज मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात १२ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार, तक्रारदाराने याविषयी एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडवणुकीबाबत माहिती दिली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी करून सापळा रचत शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. यावेळी रक्कम स्वीकारताना संशयितांना पकडले. याप्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय गरुड, प्रभाकर गवळी, शीतल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयित वायरमन नागेश्वर पेंढारकर यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम कार्यालयाच्या परिसरात असलेल्या चहा टपरीचालक संशयित शुभम जाधव यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार, तक्रारदाराने रक्कम दिली असताना एससीबीच्या पथकाने जाधवसह पेंढारकर यांना ताब्यात घेतले आहे.