पाचोरा (प्रतिनिधी) ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीच्याच दिवशी रेल्वेखाली सापडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा रेल्वे स्थानक परिसरात घडली. पाचोरा येथील गँगमन सुरेश सोनवणे हे दि. ३१ रोजी सेवानिवृत्त होणार होते. कार्यालयातील सत्कार स्वीकारून ते भुसावळ कार्यालयात सत्कार कार्यक्रमास जात होते. परंतू काशी एक्स्प्रेसच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी भुसावळ जातांना घडली घटना !
पाचोरा रेल्वे स्टेशन येथे गँगमन म्हणून युनिट नंबर ४ चे सुपरवायझर असलेले सुरेश मोहन सोनवणे (वय ६० वर्षे रा. जामनेर) हे आज दुपारी १२:४५ वाजता काशी एक्स्प्रेसच्या खाली आल्याने अपघाती निधन झाले. पाचोरा रेल्वे स्टेशन जवळ त्यांचा मृतदेह आढळला. सुरेश सोनवणे यांनी गँगमन म्हणून ३२ वर्षे रेल्वेत सेवा दिली होती. ते दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी ते भुसावळ येथे जाणार होते. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घरी सेवानिवृत्तीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे होते आयोजन !
सुरेश सोनवणे यांच्या जामनेर येथील घरी सेवानिवृत्तीनिमित्त नातेवाईकांच्या समक्ष मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. स्वागत समारंभाची तयारी झाली होती; मात्र तत्पूर्वीच त्यांच्या मृत्यूचीच बातमी नातेवाईकांना कळल्याने एकच शोककळा पसरली. सुरेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सिद्धार्थ व एक मुलगी विवाहित असून रेल्वे प्रशासनातर्फे त्यांना २५ हजारांची तत्काळ मदत देण्यात आली. तसेच अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील एकाला नोकरी देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे रेल्वे तर्फे सांगण्यात आले. सेवानिवृत्तीच्याच दिवशी सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्काराची वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.