चमोली (वृत्तसंस्था) उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली जिल्ह्यातील ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर (Rishikesh-Badrinath Highway) भरधाव वेगानं येणारी कार 250 मीटर खोल दरीत (Car Accident) कोसळल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते उत्तराखंडच्या बाच गावातील रहिवाशी होते. येत्या १२ मे रोजी मुलीचे लग्न असल्याने मेरठ येथून लग्नाची खरेदी करून ते कारने घरी परतत होते. दरम्यान, ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर तोताघाटीजवळ अचानक कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट 250 मीटर खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये प्रताप सिंग (वय ४०), भागीरथी देवी (वय ३६), पिंकी (वय २५), विजय (वय १५) आणि मंजू (वय १२) या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, कार 250 फुट दरीत असल्याने पोलिसांना अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याचवेळी घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमचे पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या अथक प्रयत्नानंतर कारमधून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत श्रीनगरच्या रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकीचे (वय २५) येत्या १२ मे रोजी लग्न होणार होते. याच लग्नाची खरेदी करण्यासाठी हे कुटुंबिय मेरठ येथे खरेदीस गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.