छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) फुलंब्री खुलताबाद रोडवरील वानेगाव फाट्यावर मोटरसायकल घसरून न्यू बालाजी नगर, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथील बहीण जागीच ठार तर भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात फुलंब्री- खुलताबाद रस्त्यावर गणेगाव फाट्यानजीक शुक्रवारी दुपारी घडला. अंजली राजू सोनवणे (वय १८) असे मृत बहिणीचे तर रोहन सोनवणे असे गंभीर जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.
अंजली व रोहन सोनवणे हे भाऊ बहीण शालेय प्रमाणपत्र घेऊन घरी छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीने परत जात होते. दरम्यान,त्याची मोटारसायकल वानेगाव फाट्याजवळ अचानक घसरली. यात अंजली व रोहन यांना जबर मार लागला. फुलंब्री येथील महात्मा फुले रुग्णवाहिकेदार चालक विजय देवमाळी यांनी दोघांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात त्वरित दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अंजलीला मृत घोषित केले, तर जखमी रोहनवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष डोंगरे यांनी पंचनामा केला. या अपघाताची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.